जरा आसपासच्या मुलांचा दिनक्रम पाहावा. सकाळी झोपेतून उठताच शाळेच्या तयारीला जुंपली जातात मुले. शाळेतला दिनक्रम पार पाडून घरी येताच, दोन घास खाल्ले न खाल्ले की त्यांना शिकवणीला पिटाळले जाते. त्यातच भरीस भर म्हणून चित्रकलेचा क्लास, स्कॉलरशिपचा क्लास, अतिरिक्त परीक्षांचा क्लास, गाण्या-नाचण्याचा क्लास, कराटे क्लास हे असतातच. या सार्यानंतर थोडेसे जरी खेळायला मिळाले तरी त्यांना नवसंजीवनी मिळते. पण ते मिळेलच असे सार्यांचेच भाग्य कुठले? कित्येकांना बाहेर खेळायला जागाच उपलब्ध नसते.
शाळकरी मुलांच्या दप्तराच्या ओझ्याबद्दल अकारण इतका बाऊ कशासाठी, असा आश्चर्यकारक सवाल आता मुंबई उच्च न्यायालयाने केला असून दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी 2015 साली दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. विद्यार्थीच वेळापत्रकानुसार वह्यापुस्तके नेत नसल्यामुळे दप्तराच्या ओझे वाढते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. आता न्यायालयानेच सगळा दोष विद्यार्थ्यांच्या माथी मारल्याने शाळांना व शिक्षकांना निश्चितच हायसे वाटसे असेल. मुलांना पाठदुखी जडते ती टीव्ही बघण्याने, कारण पालक त्यांना बाहेर खेळायला पाठवत नाहीत. आमच्या काळी आम्ही दप्तर पाठीवर घेऊन सिमल्यामध्ये सात किमी चालत जात असू. आम्हाला का स्पाँडिलायटिस जडला नाही, असा सवाल देखील न्यायाधीश महाशयांनी केला आहे. आता काय बोलावे या निरीक्षणांवर! आजच्या इतकी वह्या-पुस्तके त्या काळी खरेच असत का, हा संशोधनाचा विषय ठरावा. खेरीज मुले तेव्हा बिनदिक्कत शाळेतले पाणी पीत आणि त्यांना कुठलाही जंतुसंसर्ग होत नसे. पण आज किती पालक मुलांना पाण्याच्या बाटलीशिवाय शाळेत पाठवू धजावतील? दप्तराच्या ओझ्यात पाण्याच्या बाटलीची भर मोठी असते. आता प्लास्टिकबंदीनंतर तर मुलांना धातूच्या जड बाटल्या नेणे भाग पडते आहे. रोजचे दहा किंवा अकरा तास म्हणजे जवळपास एखाददुसरा विषय वगळता सारी पुस्तके आणि वह्या मुलांना न्याव्याच लागतात. जवळपास प्रत्येकच विषयाकरिता एकाहून अधिक वह्या असतात. म्हणजे भाषा विषयाची मुख्य वही अधिक निबंधाची जम्बो वही. तीन भाषांच्या सहा वह्या. विज्ञानाच्या दोन, गणिताच्या दोन, समाजशास्त्राच्याही दोन, अधिक प्रयोगवह्या, व्यायामाची वही, स्काऊट-गाइडची वही, शाळेची डायरी, व्यायामाचा पोशाख असा सगळा जामानिमा असतो. व्याकरण शिकवणार का निबंध की धडा, हे शिक्षकांचे नक्की नसते. तेच इतर विषय शिक्षकांचे. आयत्या वेळी शिक्षक काहीही घेतील म्हणून विद्यार्थी सारे सोबत नेतात. फुकाचा ओरडा वा वर्गाबाहेर बसण्याची शिक्षा टाळायची असते त्यांना. गृहपाठ करता-करताच मेटाकुटीला येतात मुले, मग वेळापत्रकानुसार दप्तर लावत बसणे जिवावर येणार नाही का? एकूण काय, दमल्या-थकल्याने आणि ओरडा टाळण्याच्या हेतूने वेळापत्रकानुसार दप्तर भरण्याच्या भानगडीत मुले पडत नाहीत. अर्थात न्यायालयाने याबद्दल पालकांना जबाबदार धरले आहे, ते बरोबरच आहे. वेळापत्रकानुसार दप्तर लावण्यात पालकांचा सहभाग असल्यास त्यानिमित्ताने मुलांशी बर्याच गप्पा होऊ शकतात. न्यायालयाने खडसावल्यानुसार पालक आणि शाळा यांनी मिळून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. टीव्हीमुळे पाठदुखी जडते का दप्तरामुळे, या वादात न पडता ओझे कमी करण्यावर एकमत झाल्यास मुलांना दिलासा मिळेल एवढे नक्की!