वाशिम : प्रतिनिधी
राज्यातील पोलिसांच्या वर्दीची ओळख तशी सगळ्यांनाच आहे. खाकी वर्दी आणि डोक्यावर टोपी भल्याभल्यांना घाम फोडते, मात्र कर्तव्यावर काम करताना पोलीस कर्मचार्यांना जुनी टोपी सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागायची. त्यामुळे टोपी सांभाळायची की कर्तव्य पार पाडायचं, असा प्रश्न पडत होता, पण आता पोलिसांच्या डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीने आता आपलं रूप बदललं आहे.
पोलीस गणवेशात बेसबॉल खेळातील टोपीप्रमाणे अतिरिक्त टोपीचा समावेश करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांनी 24 एप्रिल 2019 रोजी दिला. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे, तर 70 वर्ष जुन्या टोपीची सक्ती केवळ पोलीस कार्यालयीन तपासणी आणि परेडसाठीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांना जुनी टोपी वापरताना अनेक अडचणी भेडसावत होत्या. जुनी टोपी डोक्यात व्यवस्थित न बसणे, गुन्हेगारांचा पाठलाग करताना टोपी पडणे अशाप्रकारच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर या नव्या बेसबॉल कॅपच्या वापराचा पर्याय समोर आला. त्यानुसार या बेसबॉल कॅपच्या प्रयोगानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच या नव्या बेसबॉल कॅपचा वापर करण्यात येणार आहे, मात्र जुनी टोपीही वापरात
राहणार आहे.
एकीकडे पोलिसांच्या टोपीमध्ये बदल होत आहे, यंत्रणाही हायटेक होत आहे, मात्र चोरी आणि फसवणूक करणार्या आरोपींनीही आपली कार्यपद्धती बदलली आहे. त्यामुळे आता नवीन टोपी परिधान केल्यावर गुन्ह्याचा छडा लावताना किवा आरोपीला पकडताना खरोखरच बदल होतील, अशी अपेक्षा.
RamPrahar – The Panvel Daily Paper