नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्सुक आहेत. बंदूक-बॉम्बपेक्षा विकासाची ताकद अधिक आहे. जे लोक द्वेष पसरवत आहेत, त्यांचा हेतू कधीच साध्य होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ’मन की बात’मध्ये म्हणाले. या वेळी मोदींनी पाणी संकट, चांद्रयान-2चे प्रक्षेपण, जल धोरणांसह विविध योजनांचा उल्लेख या कार्यक्रमात केला.
मोदींनी ’मन की बात’मध्ये जम्मू-काश्मीरमधील शोपिया येथील रहिवासी मोहम्मद अस्लम यांचा उल्लेख केला. अस्लम यांनी माय गाव अॅपवर ’बॅक टू व्हिलेज’ या कार्यक्रमाची माहिती दिली. जूनमध्ये या कार्यक्रमाची माहिती घेतली असता काश्मीरमधील लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत असे समजले, अशी माहिती मोदींनी या वेळी दिली. या कार्यक्रमांतर्गत अनेक वरिष्ठ अधिकारी गावागावांत गेले. तेथे ग्रामस्थांनी अधिकार्यांना समस्यांची माहिती दिली, अशी माहितीही मोदींनी दिली.