कर्जत ः बातमीदार
उद्योजक डॉ. संकेत बर्हाळे यांनी पुणे येथे फिग एमडी ही संस्था स्थापन केली असून त्या संस्थेच्या वतीने टेली मेडिसिन दवाखान्याची संकल्पना राबविली जात आहे. अशी संकल्पना राबविणारी फिग एमडी ही देशातील पहिलीच संस्था असून देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळजवळील सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्रात सुरू झाला आहे. या टेली मेडिसिन दवाखान्यात रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करीत असून उपचारदेखील करीत आहेत. पुणे येथे डॉ. संकेत बर्हाळे यांनी भारतात टेली मेडिसिन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यांनी कर्नल सिन्हा, डॉ. तुषार देशपांडे, डॉ. चिराग चव्हाण, डॉ. सत्यजित हांडे, डॉ. महेंद्र रोकडे यांच्यावर फिग एमडी या टेली मेडिसिन दवाखान्याची जबाबदारी दिली आहे. ही संकल्पना कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणारे चंदन भडसावळे यांनी आपल्या सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्रात प्रत्यक्षात आणली आहे. देशातील दुसरे टेली मेडिसिन सेंटर कर्जत तालुक्यातील सगुणा बाग येथे सुरू झाले आहे. सव्वा महिन्यात तब्बल 150 रुग्णांवर या टेली मेडिसिन दवाखान्यात उपचार झाले आहेत. सगुणा बागमध्ये या टेली मेडिसिन दवाखान्याला ’वरदान ई-दवाखाना’ असे नाव देण्यात आले आहे.