पायरीचीवाडी, कासारवाडी ग्रामस्थ सरसावले
पाली : प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हाहाकार माजवला आहे. तेथील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी व कासारवाडी या गावातील ग्रामस्थांनी शिक्षक कुणाल पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरातून धान्य, डाळी व कपड्यांचे संकलन केले. हे साहित्य ते पाली येथील शिवऋण प्रतिष्ठानकडे सुपूर्द करणार असून, प्रतिष्ठानच्या वतीने हे सर्व साहित्य स्वातंत्र्यदिनी (दि. 15) कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक कुणाल पवार यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत पायरीचीवाडी व कासारवाडी या दोन्ही गावांची गावकी घेतली. पूरग्रस्तांची परिस्थिती ग्रामस्थांना समजावून सांगितली. अशा वेळी आपण माणुसकी म्हणून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करू या. या वेळी फक्त सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीची गरज आहे, अशी भावनिक हाक दिली. कुणाल पवार यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी गावातील प्रत्येक घरातून तांदूळ, डाळ व कपडे जमा केले. या वेळी संजना खाडे यांनी 15 नव्या साड्या दिल्या. गावातील सर्वांनी सहभागी होत अत्यावश्यक वस्तू जमा करीत आपला सहभाग नोंदविला.
पायरीचीवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक कुणाल पवार यांनी गावकी घेऊन सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. त्याला पाठिंबा देत आम्ही सर्वांनीच प्रत्येक घरातून तांदूळ, डाळी व कपडे देऊन मदत करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
-ह.भ.प.सुरेश महाराज पातेरे, ग्रामस्थ, कासारवाडी, ता. सुधागड
नमाज पठनानंतर मुस्लिम बांधवांनी गोळा केली मदत

पाली : प्रतिनिधी
बकरी ईदनिमित्त पालीतील जामा मशिदीत सोमवारी नमाज पठन केल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी मदतीची झोळी पसरवून पूरग्रस्तांसाठी आर्थिक निधी गोळा केला. या वेळी अजीज पानसरे, इम्तियाज पठाण यांनी कुर्बानीचा खर्च न करता त्याचे पैसे पूरग्रस्तांना दिले.
बकरी ईदनिमित्त सर्वच मुस्लिम बांधव येथील मशिदीमध्ये जमा झाले होते. त्या सर्वांनी कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी झोळी पसरविण्यात आली. उपस्थितांनी झोळीत सढळ हस्ते भरभरून निधी टाकला. हा निधी पाली तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे. या वेळी सुलतान बेनसेकर, महम्मद अली धनसे, बशीरभाई परबळकर, इम्तियाज पठाण, अजीज पानसरे, इस्माईल परबळकर, हुसेन लद्दू, युसूफ पठाण, असिक मणियार, इमदाज पठाण, समद पठाण, एजाज पानसरे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कोल्हापूर व सांगलीमधील महापूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी बकरी ईदच्या कुर्बानीचा खर्च टाळून आम्ही निधी गोळा केला आहे. तो तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात येईल. सणाच्या दिवशी पूरग्रस्तांसाठी केलेली मदत हेच आमचे मोठे समाधान आहे.
-अजीज पानसरे, ग्रामस्थ, पाली, ता. सुधागड
केरळवासीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

खोपोली : प्रतिनिधी
व्यवसायानिमित्त केरळ राज्यातून वर्षानुवर्षे खोपोलीत स्थायिक झालेल्या केरळीय समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामान गोळा केले आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस व पुराने थैमान घातल्यामुळे तेथील स्थानिकांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर खोपोलीत व्यवसाय व नोकरीनिमित्त एकत्रित राहत असलेल्या केरळी समाजबांधवांनी केरळ कल्चर सोसायटीचे अध्यक्ष षणमुखन यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक सामान जमा केले. यात पोहे, तांदूळ, डाळ, साखर, मीठ, पीठ, चहा पावडर, माचिस बॉक्स, मेणबत्ती यांचा समावेश आहे. त्यांचे एक एक पॅकेटचे किट तयार करून त्यास औषधे व पाणी बॉटल्स बॉक्सही जोडण्यात आले आहेत.
खोपोलीतील सॅम्युअल मॉलचे बेबीशेठ सॅम्युअल यांनी पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी 60 साड्या, 427 शर्ट, 50 पँट, 300 नाईटी, 100 लहान मुलांचे कपडे व छोट्या बालकांसाठी 150 कपड्यांचे जोड केरळ कल्चर सोसायटीचे अध्यक्ष षणमुखन यांच्याकडे सुपूर्द केले. जमा केलेल्या सर्व सामानांचे एकत्रित किट तयार करण्याचे काम सोमवारी केरळ कल्चर सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले.
या वेळी स्थानिक नगरसेवक बेबीशेठ सॅम्युअल, संस्थेचे अध्यक्ष षणमुखन, उपाध्यक्ष श्रीजित, सचिव श्रीकुमार, सदस्य जॉय जोसेफ, प्रमोद रामण, मुरलीधरन नायर, राजू व्ही, दिवाकरण, अनियन यांच्यासह अनेक केरळी समाजबांधव व महिला उपस्थित होत्या. सदरचे पॅकेट तयार केल्यानंतर मंगळवारी (दि. 13) ट्रक सांगलीकडे पाठविणार असल्याचे अध्यक्ष षणमुखन यांनी सांगितले.
आम्ही केरळवासीय असलो तरी महाराष्ट्राने आम्हाला भरभरून दिले आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदत करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
– श्री. षणमुखन, अध्यक्ष, केरळ कल्चर सोसायटी, खोपोली
RamPrahar – The Panvel Daily Paper