पनवेल ः बातमीदार
तालुक्यातील कोन गावामध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाली असून दगडफेक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस व्हॅन आणि इतर वाहने एकापाठोपाठ सायरनचा आवाज करीत कोन येथील पोलीस चौकीजवळ दाखल झाले. या वेळी नेमके काय झाले हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काय झाले हे कोणालाच कळत नव्हते. या वेळी नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, मात्र हे मॉकड्रिल असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पनवेल परिसरातील कोन गावामध्ये दंगल सुरू असून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, तसेच दगडफेक सुरू आहे. अशी खबर मिळाल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ सुरू होते. त्यानंतर परिमंडळ दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना याबाबत कळविण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त संजय कुमार, सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे, खांदेश्वरचे वपोनि योगेश मोरे, सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ताबडतोब कोन गावाच्या हद्दीत घडलेल्या घटनास्थळी दाखल झाले. शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, पनवेल फायर बिग्रेड, अॅम्ब्युलन्स पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचल्या.