Breaking News

उमटे धरणातून 60 गावांना होतोय अशुद्ध पाणीपुरवठा; जि. प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची कबुली

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून मातीमिश्रित अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची कबुली रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी शुक्रवारी (दि. 6) पत्रकार परिषदेत दिली.

उमटे धरणातून मातीमिश्रित अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी ही कबुली दिली. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र कोळी हे या वेळी उपस्थित होते.

अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले की, उमटे धरणातून 30 ऑगस्टपासूनच शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. भरपूर पाऊस पडल्यामुळे वॉल खराब झाला. त्यामुळे मातीमिश्रित पाणी नळाद्वारे येऊ लागले. वॉल दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्याला महिन्याचा कालावधी लागेल. येत्या महिनाभरात जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

उमटे धरण हे 1984 साली बांधले असून त्यातून 60 गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत असतो. पाच वर्षांपूर्वी या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. काम दिलेल्या ठेकेदाराने प्रकल्प अपूर्ण ठेवला. त्यानंतर प्रकल्पाचे काम दुसर्‍या ठेकेदाराला दिल्यानंतर वर्षभरात काम पूर्ण झाले आहे. तरीदेखील त्यातून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply