पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील सिडकोची अर्धवट असलेली कामे पूर्ण करूनच महापालिकेकडे हस्तांतरित केली जातील, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते सोमवारी (दि. 16) नवीन पनवेल येथे रस्ते आणि पाणपोई भूमिपूजन समारंभात बोलत होते.
नवीन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. बिकानेर चौकात झालेल्या या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, जयवंत महामुनी, बूथ अध्यक्ष वैशाली पाटील, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे, भोईर, जयराम मुंबईकर, किशोर मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सिडकोच्या वतीने करण्यात येणार्या या आठ कोटी 26 लाख रुपये खर्चाच्या रस्त्यांमुळे दळणवळण अधिक सुकर होणार आहे.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामांचा शुभारंभ सगळ्या नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे होत आहे. सिडकोला काम करताना अनेक बंधने असतात. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना सिडको आणि महापालिका हातात हात घालून काम करेल, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, बिकानेर चौकात संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी वाहतूक पोलीस ठेवण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी महापालिकेतर्फे ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्यात येईल.
यानंतर सेक्टर 16मधील पिल्ले महाविद्यालयाजवळील गार्डनमधील पाणपोई आणि राजेश्री वावेकर यांच्या नगरसेविका निधीमधून उभारण्यात येणार्या पाणपोईचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.