Breaking News

लक्ष्मी आय समूहामध्ये चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया

पनवेल : रामप्रहर वृत्त

लक्ष्मी आय समूहामध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे एका चिमुरडीच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या मुलीची 80 टक्के दृष्टी परत आली आहे. इंदापूर, पुणे येथे राहणार्‍या निकिता सकपाळ (वय 5 वर्षे) हिच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती व त्यामुळे या डोळ्याची तिची फक्त एक टक्के दृष्टी शिल्लक होती.

या मुलीच्या पालकांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात अडथळा येत होता. कळंबोली येथे राहत असलेल्या तिच्या आत्याला पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टची माहिती असल्याने त्यांनी लगेच संपर्क साधून या मुलीला पनवेल येथे आणले. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेल्या बालनेत्ररोगविकार तज्ज्ञ डॉ. मोनिका सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली निकितावर पुढील उपचार सुरू करण्यात आले. तिच्या वयाचा विचार करता ही शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुशलरीत्या हाताळणे गरजेचे होते. लक्ष्मी आय समूहामध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या मुलीची 80 टक्के दृष्टी परत आली आहे. बिईंग ह्यूमन या सामाजिक संस्थने केलेल्या आर्थिक मदतीमुळे ही शस्त्रक्रिया लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत करण्यात आल्याची माहिती या वेळी लक्ष्मी आय समूहातर्फे देण्यात आली. लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक व भारतातील आघाडीचे डोळ्याचे निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नवी मुंबई, ठाणे, रायगड, तसेच रत्नागिरीतील शेकडो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply