अलिबाग : प्रतिनिधी
पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात असलेले हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांच्या आवास येथील फार्म हाऊसला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील ठोकले आहे. दरम्यान, वाधवन यांचा हा बंगला सीआरझेड कायद्याच्या रडारवर आहे.
आवास व सासवणे गावांदरम्यान समुद्रकिनार्याला लागूनच वाधवन पितापुत्रांच्या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळून आल्या, तसेच बंगल्याच्या आवारात कार व अन्य गाड्याही आढळल्या आहेत, मात्र या कारवाईबाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. ईडीच्या जप्तीनंतर पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा किहीम येथील बेकायदा बंगला महसूल विभागाने जमीनदोस्त केला होता. वाधवन यांचा बंगलाही सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आला आहे. त्यामुळे या बंगल्यावरदेखील महसूल प्रशासनाचा हातोडा पडण्याची दाट शक्यता असून, विधानसभा निवडणुकीनंतर ही कारवाई होण्याची शक्यता आहे.