

रायगड जिल्ह्यातून शेकाप हद्दपार झाला, भाजपच्या जागा वाढल्या, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व अधोरेखित झाले, राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली, महायुतीला मोठे यश मिळाले, अशा चार ते पाच वाक्यांत रायगड जिल्ह्यातील निकालाचे विवेचन करता येईल.
महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक झाली. निकाल लागला. विजयी उमेदवारांनी गुलाल उडविला, तर पराभूत उमेदवार आत्मचिंतन करीत असतील. रायगड जिल्ह्यात सगळ्यात मोठा धक्का आणि फटका बसला आहे. रायगड हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेकाप सोडला आणि तिथपासून शेकापला गळती लागली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे अस्तित्वच आता संपुष्टात आले आहे.
महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माणिक जगताप विरुद्ध शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात तिसर्यांदा लढत झाली. या लढतीत भरत गोगावले यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली, तर माणिक जगताप यांनी पराभवाची हॅट्ट्रिक साधली. महाड नगर परिषदेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्नेहल जगताप-कामत विजयी झाल्या होत्या, पण विधानसभेला माणिक जगताप यांची जादू चालली नाही. त्यांना तिसर्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
श्रीवर्धन मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांनी आपली कन्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना माझ्याकडून चुका झाल्या. त्याची शिक्षा माझ्या लेकीला देऊ नका, असे सांगण्याची वेळ सुनील तटकरे यांच्यावर आली, तर आदिती तटकरे यांच्या मातोश्री वरदा तटकरे यांनी माझ्या लेकीला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन केले. विनोद घोसाळकर यांनी तटकरेंची दमछाक केली. थोडक्या मतांनी आदिती तटकरे यांचा विजय झाला. श्रीवर्धनची एकमेव जागा केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला मिळाली.
अलिबागमध्ये शेकापची मोठी ताकद आहे असे मानले जाते. यापूर्वी केवळ चारवेळा बिगर शेकापचे आमदार विजयी झाले आहेत. दत्ता खानविलकर, श्री. कुंटे, ना. का. भगत, मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. पुन्हा एकदा शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी येथे विकास घडविला. शेकापचे विद्यमान आमदार पंडितशेठ पाटील यांचा महेंद्र दळवी यांनी दणकून पराभव केला. उरण, पेण या ठिकाणी शेकापला आशा होती, पण अलिबागचा गडही शेकापला राखता आला नाही.
उरण मतदारसंघात चमत्कार घडला. या ठिकाणी अपक्ष उमेदवार जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. शिवसेनेचे मनोहर भोईर, शेकापचे विवेक पाटील व भाजपचे बंडखोर महेश बालदी यांच्यात सामना रंगला. मनोहर भोईर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. बादली उलटून लावण्याची गर्जना त्यांनी केली, पण बालदी विजयी झाले. विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणही भोवल्याची चर्चा आहे. महेश बालदी यांनी आमदार नसतानाही 500 कोटींहून अधिक निधी आणून विकासकामे केली. त्यामुळे त्यांचा विजय लक्षवेधी ठरला आहे. महेश बालदी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रचारादरम्यान शिटीला मत म्हणजे भाजपला मत, असा प्रचार त्यांनी जाहीरपणे केला. आपल्या प्रचार पत्रकात भाजपचे बंडखोर उमेदवार असा उल्लेख करण्याचे धाडस दाखवून आपण भाजपचेच आहोत हे यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे उरणची जागा भाजपने जिंकली, असे म्हणायला हरकत नाही.
पेणमध्ये शेकापचे धैर्यशील पाटील विरुद्ध भाजपचे रविशेठ पाटील यांच्यात लढत झाली. विकासाची वाट धरत त्यांनी भाजपत प्रवेश केला व भाजपला येथे यश मिळवून दिले. रविशेठ पाटील मंत्री होते. निवडणुकांचा त्यांना अनुभव आहे. तो या वेळी कामी आला. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश लाड यांची हॅट्ट्रिक हुकली आहे. शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी येथे विजय मिळविला आहे.
पनवेलमधील विजय सर्वांत मोठा आहे. एक लाखांवर मताधिक्य घेण्याचा निर्धार भाजपने केला होता. पनवेलमध्ये कमी मतदान झाले. त्यामुळे एक लाख मताधिक्याचा टप्पा त्यांना पार करता आला नसला तरी लाखाच्या आसपास ते पोहचले. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य त्यांनी घेतले व विजयाची हॅट्ट्रिक साधली. दोन वेळा पनवेल मतदारसंघाचे नेतृत्व करताना प्रशांत ठाकूर यांनी मोठी विकासकामे केली. सिडको अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना भाजपने दिली व या संधीचे त्यांनी सोनेकेले. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशांत ठाकूर यांच्याकडे जबाबदारी आहे. 2014मध्ये त्यांच्या रूपाने भाजपची एकच जागा जिल्ह्यात होती. आता भाजपच्या जागा वाढल्या. महायुतीला मोठे यश मिळाले. भाजपला मिळालेले यश भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे नेतृत्व सिध्द करणारे आहे.
-योगेश बांडागळे
RamPrahar – The Panvel Daily Paper