Breaking News

पनवेल आगारातील उरण प्रवासी शेडवरील होर्डिंग धोकादायक

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल एसटी स्थानकावरील  उरणला जाणार्‍या गाड्यांच्या प्रवासी शेडवरील जाहिरातीच्या होर्डिंगचे पत्रे लोंबकळत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. उरणला जाणार्‍या प्रवाशांना  कडक उन्हात किंवा पावसात  गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागत आहे. त्यातच पत्रा पडून अपघात झाल्यास त्याची जवाबदारी कोणाची, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेल स्थानकातून  रोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या आगाराच्या नवीन बांधकामाचा बीओटी तत्त्वावर ठेका देण्यात आला आहे. आगाराचे काम सुरू होणार असल्याने पनवेल स्थानकामध्ये उरणला जाणार्‍या प्रवाशांसाठी असलेली शेड अपुरी पडत असतानाही नवीन शेड उभारली जात नाही. त्या ठिकाणी प्रवाशांची लांबच लांब रांग सध्याच्या आगारातील आतील बाजूपर्यंत जाते. वाहतूक कोंडीमुळे गाड्या उशिरा येत असल्याने प्रवाशांना अनेक तास उभे राहावे लागते. शेड पुरत नसल्याने प्रवाशांना उन्हात किंवा पावसात उभे राहावे लागते.

उरण गाड्या लागणार्‍या शेडच्या वरती लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगचे पत्रे फाटल्यामुळे लोंबकळत आहेत. हे पत्रे धोकादायक आहेत. रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या डोक्यात ते पडल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने जाहिरात एजन्सीला धोकादायक होर्डिंग  काढून टाकायला सांगायला हवे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

– होर्डिंगचे पत्रे फाटल्यामुळे ते लोंबकळत असल्याने दुर्घटना घडू शकते. यासाठी ते धोकादायक पत्रे काढून टाकण्याबाबत संबंधित एजन्सीला कळविले आहे. आमच्या विभागीय कार्यालयालाही त्याची माहिती दिली आहे.-श्रीमती वानखडे, वरिष्ठ व्यवस्थापक, पनवेल आगार

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply