कर्जत : बातमीदार
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि स्वराज्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील किल्ले भिवगड येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी केली. त्याचवेळी शिवछत्रपती परिवाराच्या वतीने किल्ल्याच्या पायथ्यशी असलेल्या गौरकामत गावातील आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले.
किल्ले भिवगडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी आलेल्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने गौरकामत गावात प्रभात फेरी काढून किल्ले भिवगड येथील मोहिमेची माहिती देण्यात आली. त्यांनी किल्ले भिवगडाकडे जाणार्या रस्त्यावर नामफलक लावला. राजा शिवछत्रपती परिवाराचे 150 कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी किल्ल्यावर झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यापासून ते झाडे लावण्यापर्यंत सर्व कामे केली. यावेळी किल्ल्यावर लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्याची शपथदेखील या स्वयंसेवकांनी घेतली.
पावसाळयात उगवलेल्या गवताने भिवगडावरील पुरातन वास्तूंना विळखा दिला होता. शिवछत्रपती परिवाराच्या एका गटाने हे गवत काढून, अनेक वास्तूंची स्वच्छता केली. गडावर वेगवेगळ्या ठिकाणी पोहचण्याचे मार्ग नव्याने येणार्यांना तात्काळ दिसावेत, यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराकडून दिशादर्शक फलक लावण्यात आले.