Breaking News

चेकमध्ये फेरफार करून पाच लाखांचा गंडा

पनवेल : बातमीदार

पाँडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने पाँडिचेरी येथील मेसर्स बीएचएम सर्जिकल प्रा. लि. या कंपनीला कुरियरद्वारे पाठविलेल्या 74 हजार 709 रुपयांच्या चेकची संतोष बबन पाटील नामक व्यक्तीने चोरी करून या चेकवर स्वत:चे नाव व पाच लाख 74 हजार 709 रुपयांची रक्कम टाकून ही रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी संतोष पाटील याच्यावर फसवणुकीसह बनवाटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मद्रास मेडिकल मिशनच्या पाँडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने जुलै महिन्यामध्ये बीएचएम सर्जिकल या कंपनीला 74 हजार 709 रुपयांचा चेक कुरियरद्वारे पाठवून दिला होता, मात्र चोरांनी चेन्नई येथील प्रोफेशन कुरियरमधून चेकची चोरी करून त्याच्यावरील कंपनीचे नाव मिटवून तिथे संतोष बबन पाटील असे नाव लिहिले. तसेच चेकवरील मूळ रकमेऐवजी ती पाच लाख 74 हजार 709 इतकी टाकली आणि 16 ऑगस्ट 2019 रोजी हा चेक संतोष पाटील याने सीवूड्स येथील सेंट्रल बँकेत टाकला. सेंट्रल बँकेच्या सीवूड्स येथील शाखेने हा चेक जमा करून घेतला, मात्र संतोष पाटील याच्यावर संशय आल्याने बँकेच्या व्यवस्थापिका निशा सहा यांनी त्याला केवळ अडीच लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम काढू दिली नाही. त्यामुळे आरोपी संतोष पाटील याने त्याच दिवशी सेंट्रल बँकेच्या वाशी येथील शाखेतून अडीच लाख रुपये आरटीजीएसद्वारे कॅनरा बँकेच्या खात्यात वळते केले, तसेच उर्वरित 74 हजार 709 रुपयांची रक्कम आयएमपीएसद्वारे हस्तांतरित केली. अशा पद्धतीने संतोष पाटील याने एकाच दिवसात संपूर्ण रक्कम काढून घेतली.

दरम्यान, पाँडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने बीएचएम सर्जिकल कंपनीला चेकने दिलेली रक्कम संतोष पाटील नामक व्यक्तीला दिली गेल्याने तसेच पाच लाख रुपये अधिकचे गेल्याने सेंट्रल बँकेच्या पाँडिचेरी ब्रँचने सीवूड्स येथील ब्रँचला याबाबत कळवले. त्यामुळे येथील बँकेच्या व्यवस्थापिका निशा सहा यांनी संतोष पाटील याला संपर्क साधून त्याने बँकेतून चुकीची रक्कम घेतल्याचे व ही रक्कम त्याला बँकेत जमा करण्यास सांगितले. त्या वेळी आरोपी पाटील यानेदेखील चूक झाल्याचे मान्य करून ही रक्कम बँकेत जमा करणार असल्याचा मेसेज बँकेच्या व्यवस्थापिका सहा यांना पाठविला, मात्र त्यानंतरही संतोषने ही रक्कम बँकेत जमा न करता या रकमेचा अपहार केला. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापिका सहा यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पाटील याच्यावर फसवणुकीसह बनवाटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply