नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजचा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधिवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 26) काढले. संविधान दिनानिमित्त ते संसदेमध्ये बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचे संविधान आपल्याला नागरिकांना असलेले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देते. हा आपल्या संविधानाचा विशेष पैलू आहे. संविधानामध्ये जी कर्तव्ये नमूद केली आहेत ती कशी पूर्ण करता येतील त्याबद्दल आपण विचार करू या.
संविधानाने आपल्या सर्वांना एकत्र बांधले आहे. भारताचे नागरिक असल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपण आपल्या कृतीने देशाला अधिक मजबूत, सशक्त बनवू या, अशीही साद पंतप्रधान मोदींनी घातली.
गेल्या 70 वर्षांत आपण स्वातंत्र्य आणि लोकशाहीला अधिक सशक्त बनवले आहे. सात दशकांपूर्वी संसदेच्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदावर सविस्तर चर्चा झाली. भारताच्या प्रत्येक स्वप्नाला शब्दामध्ये गुंफण्याचा प्रयत्न झाला, असे सांगून भारताच्या नागरिकांपासून संविधानाची सुरुवात होते. यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असून, कठीण पेचावरही तोडगा सांगितला आहे, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.दरम्यान, संपूर्ण देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper