Breaking News

पनवेल मनपातर्फे संविधान दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविकांसह प्रमुख वक्ते म्हणून द युनिक अ‍ॅकॅडमीचे संविधान अभ्यासक अक्रम जुवारी आणि इतिहास अभ्यासक प्रा. प्रशांत कांबळे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खडतर जीवनाचा आढावा घेतला. 1927 साली महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह घटनेच्या दुसर्‍या दिवशी बाबासाहेबांनी केलेल्या प्रबोधनाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांच्या आचार-विचारात तत्काळ बदल झाल्याचे दिसून आले, असे सांगून महापौरांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सभागृह नेते परेश ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, आज देशात साक्षरतेचे प्रमाण 85 टक्क्यांपेक्षा अधिक असून, हे केवळ भारतीय संविधानामुळेच घडले आहे. आजच्या युवा वर्गाने पुढाकार घेऊन जगातील सर्वांत सुंदर अशा भारतीय संविधानाचा देशाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग होतोय हे पटवून दिल्यास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जनतेला परिचय होईल.

 संविधान अभ्यासक अक्रम जुवारी आणि इतिहास अभ्यासक प्रा. प्रशांत कांबळे यांनी भारतीय संविधानामुळे देशामध्ये झालेला बदल विषद केला, तसेच राज्यघटनाकार बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला. संविधानाचे पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रारंभी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तर मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी, तेजस्विनी गलांडे, मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल सुडे, लेखाधिकारी शहाजी भोसले यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी मानले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply