Breaking News

पर्सेसिन पद्धतीच्या मासेमारीविरोधात आक्षी साखर खाडीत पारंपरिक मच्छीमारांचे आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी

एलईडी दिव्यांच्या सहाय्याने पर्सेसिन पद्धतीने चालणार्‍या मासेमारीवर तात्काळ बंद घालण्यात यावी, या मागणीसाठी 3 जानेवारी 2020 रोजी अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर खाडीत पारंपरिक मच्छिमार आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील एक हजार मच्छीमार बोटी सहभागी होतील, अशी माहिती रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समिती तर्फे मंगळवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत देण्यात आली. शासनाने एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्सेसिन, बुलनेट पध्दतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध केला आहे. मात्र तरीही रायगड जिल्ह्यात  पर्सेसिन पध्दतीने तसेच एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी केली जात आहे. याबाबत तक्रारी करणार्‍यांवर हल्ले केले जात आहेत.  वारवांर तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी आणि पर्सेसिन पध्दतीने मासेमारी करणार्‍यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे  हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानंतरही राज्य शासनाने काही कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आक्षी साखर खाडीत 3 जानेवारीला होणार्‍या आंदोलनात रायगड जिल्ह्यासह, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सहभागी होणार आहेत. एक हजार बोटी एकाच वेळेस खाडीत आणून हे आंदोलन केले जाणार आहे. शासनाने एलईडी मासेमारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, पर्सेसिन पध्दतीने मासेमारी करण्यावर बंदी घालावी, मच्छीमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा या सारख्या मागण्यासाठी हे आंदोलन होणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा कोळी महासंघाचे अध्यक्ष धर्मा घारबट, अखील महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे संजय कोळी, पुनीत तांडेल, मच्छीमार नेते मोतीराम पाटील, प्रविण तांडेल यांच्यासह रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समिती व जिल्ह्यातील सर्व प्रमुख मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply