कर्जत : बातमीदार
येत्या गुरुवारी (दि. 26) होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार आहे, तर काही ठिकाणीसुद्धा खंडग्रास स्थितीत साधारण 85% सूर्य झाकोळला गेलेला पहायला मिळेल. या ग्रहणाबद्दल लहान मुलांमध्येदेखील उत्सुकता असून, माथेरानच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेतील विध्यार्थ्यांना ही खगोलशास्त्रीय पर्वणी अनुभवता येणार आहे. एका वर्षात जगभरात साधारणपणे दोन ते जास्तीत जास्त पाच ग्रहणे होतात. ती खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती या तीन प्रकारांपैकी कोणतीही असू शकतात, मात्र या जागा भिन्न असतात. गुरुवारचे ग्रहण सकाळी 8च्या सुमारास सुरू होणार असल्याने व डिसेंबर महिना असल्याने खूप मोठ्या संख्येने लोक त्याचा आनंद घेऊ शकतील. भारतातून कंकणाकृती स्थिती साधारण सव्वातीन मिनिटे दिसेल. माथेरान येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेचे संचालक व खगोल अभ्यासक शशिभूषण गव्हाणकर हे माथेरानच्या पूर्वेला असणार्या पॉईंटवरून या सूर्यग्रहणाची माहिती देऊन सूर्य व पृथ्वीचा अनोखा खेळ विद्यार्थ्यांना दाखविणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper