कर्जत नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर प्रथमच सभा झाल्याने ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होईल आणि आचारसंहिता लागेल म्हणून कर्जत नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. नगर परिषद कार्यालय इमारत दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, मौजे भिसेगावातील अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम, नगरोत्थान जिल्हास्तर योजनेंतर्गत नगर परिषदेने एक कोटी 63 लाख नऊ हजार 286 रुपयांच्या 23 कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहेत.तसेच आकुर्ले आणि गुंडगे विश्वनगर येथे जलकुंभ बांधणे या कामाबाबत चर्चा करण्यात आली व त्याला सभागृहाने मंजुरी दिली. या चर्चेत राहुल डाळींबकर, शरद लाड, सोमनाथ ठोंबरे यांनी सहभाग घेतला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी गेली 25 वर्षे गजाननबुवा पाटील यांच्या स्मारकासाठी समिती जागेची मागणी करत आहे, असे सांगितले. याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. याबाबत समिती नेमून निर्णय घेण्यात येणार आहे.