Breaking News

रोहितची कमाल, विराटची धमाल!

कर्णधार, उपकर्णधाराने बंगळुरूचे मैदान गाजवले

बंगळुरू : वृत्तसंस्था
हिटमॅन रोहित शर्मा आणि रनमशीन विराट कोहली यांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्णायक वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर सात विकेट्सनी विजय मिळवत मालिका 2-1ने जिंकली. रोहित, विराटसह अन्य खेळाडू आणि संघाने बंगळुरूत काही विक्रम आपल्या नावावर केले.
* भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने वन डे क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. वन डेत अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्याने 217 डावांत 9 हजार धावा केल्या आहेत. यासाठी विराटने 194, तर एबी डिव्हिलियर्सने 208 डाव खेळले आहेत.
* कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याबाबत रोहित शर्माने विराट कोहलीशी बरोबरी केली. रविवारी रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमधील आठवे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटनेही शतकांचे अष्टक केले आहे. या क्रमवारीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नऊ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.
* बंगळुरूमध्ये रोहितने वन डेमधील 29वे शतक केले. वन डेमध्ये सर्वाधिक शतक करण्याबाबत तो चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकानंतर त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. वन डेमधील सर्वाधिक शतकाच्या क्रमवारीत सचिन (49 शतक), विराट कोहली (43) आणि रिकी पॉन्टिंग (30) यांचा क्रमांक लागतो.
* भारताचा कर्णधार विराट कोहली वन डेत सर्वांत वेगाने पाच हजार धावा करणारा कर्णधार ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी धाव घेत विराटने हा विक्रम केला. कर्णधार म्हणून 82 डावांत विराटने पाच हजारी मजल मारली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 127 डावांत ही कामगिरी केली.
* ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद शमीने चार विकेट्स घेतल्या. शमीने वन डेत दहाव्यांदा अशी कामगिरी केली आहे. भारताकडून सर्वाधिक वेळा चार विकेट्स घेण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. आगरकरने 12 वेळा अशी कामगिरी केली, तर जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 10 वेळा अशी कामगिरी केली आहे.
* धावांचा पाठलाग करताना चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने मिळवलेला हा नववा विजय आहे.
* ऑस्ट्रेलियाविरुद्ध 280हून अधिक धावांचा पाठलाग करताना भारताने मिळवलेला हा सहावा विजय आहे. याआधी 24 वेळा ऑस्ट्रेलियाने भारताला 280हून अधिक धावांचे आव्हान दिले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply