Breaking News

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पंकजा मुंडेंचे उपोषण

जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष

मुंबई ः प्रतिनिधी
कायम दुष्काळाशी सामना करीत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नासाठी भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. सोमवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 23) दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या उपोषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या, मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारमधील नेत्यांचा बहुतेक वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जातो. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली होती, पण आता मात्र या विभागाच्या विकासाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण होणार आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply