वर्षभरापूर्वी ‘चलो अयोध्या’ असा नारा देणारी शिवसेना आज राष्ट्रवादीच्या तालावर नाचताना पाहून अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना देखील दु:ख होत असेल. आमचे रंग आणि अंतरंग अजूनही भगवेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती सोहळ्याच्या मंचावरून केला, तो किती पोकळ आहे हे तेथील गर्दीला देखील उमगले असेल. उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती दिसली तर हसे हे होणारच.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 94व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राने दोन दणकेबाज सोहळे डोळे भरून पाहिले. एक होता वांद्रे-कुर्ला संकुलातील पटांगणात सत्ताधारी शिवसेनेचा वचनपूर्तीच्या आनंदाचा आणि दुसरा सोहळा पार पडला गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाचा. एकाच घराण्यातील या दोन राजकीय पक्षांनी आपापल्या सोयीनुसार स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचा सोहळा साजरा करून घेतला. दोन्ही पटांगणांवर मैदाने कार्यकर्त्यांनी फुलून गेली होती. या दोन्ही सोहळ्यांमध्ये आणखी एक साम्य होते. ते होते, भगव्या ध्वजाचे. हिंदुत्वाची शाल अलगदपणे काढून टाकत शिवसेनेने जनादेशाशी दगाफटका करून सत्ता काबीज केली खरी, पण तीच शाल आदराने उचलून नवनिर्माण सेना प्रमुखांनी आता आपल्या खांद्यावर घेतली आहे. दोन्ही पक्षांनी आता भगव्या ध्वजावर हक्क सांगितल्यामुळे काहिशी राजकीय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेसाठी टाकून दिलेली हिंदुत्वाची शाल अजूनही आमचीच असल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला असला तरी खरी परिस्थिती काय आहे हे जनता ओळखून आहे. सत्ता मिळवण्यासाठी आपल्या विचारधारेला तिलांजली देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवण्याची कुटिल नीती अंगिकारणार्या शिवसेनेची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी आहे. 19 जून 1966 रोजी प्रबोधनकारांच्या साक्षीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या संघटनेचा शुभारंभ केला. त्या संघटनेचे ‘शिवसेना’ असे नामकरण प्रबोधनकार ठाकरे यांनीच केले. या संघटनेचा ध्वज भगवाच राहील हे देखील निश्चित केले. तेव्हापासून अनेक स्थित्यंतरांमधून गेलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नव्हती. परंतु सत्तेसाठी हतबल झालेल्या उद्धव ठाकरे यांना प्रखर हिंदुत्वाचा बाणा जपणे आता अशक्य होऊन बसले आहे. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न बहाल करण्याचा आपला हट्टदेखील त्यांना सौम्य करावा लागला आहे. याउलट गोरेगावच्या नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा शिवमुद्रांकित भगवा ध्वज सादर करण्यात आला, तेव्हा सार्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र होते. महाराष्ट्राच्या व पर्यायाने भारताच्या राजकारणात शिवसेनेने सोडून दिलेला हिंदुत्वाचा अवकाश काबीज करण्याची मनसेला ही सुवर्णसंधी आहे. गेल्या 13 वर्षांत मनसेने अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्षबांधणीच्या कामासोबत सुस्पष्ट अशी हिंदुत्वाची विचारधारा जोपासल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकवार चांगले दिवस येतील यात शंका नाही. तसे संकेत नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिलेच आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी या दोन्ही केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला हे अतिशय योग्य झाले. एनआरसीच्या समर्थनार्थ येत्या 9 फेब्रुवारी रोजी मनसेतर्फे विशाल मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या मोर्चाला प्रखर देशभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा.