भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. मोहिते यांची माहिती
रोहे ः प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकर्यांची झालेली फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार, युती सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना दिलेली स्थगिती याविरोधात मंगळवारी (दि. 25) महाविकास आघाडी सरकारविरोधात महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमधील 11 तालुके व चार मतदारसंघांत अत्यंत प्रखरपणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी रोहे येथील
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास आघाडी सरकारने सातबारा कोरा, कर्जमाफी यांसह दिलेली अनेक आश्वासने फोल ठरली आहेत. पायाभूत सुविधा नाहीत. जलयुक्त शिवार योजना बंद केली. विकासाची गती मंदावली. रायगडसारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास खुंटला. यामुळे महाराष्ट्रभर महाविकास आघाडी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या वेळी माजी जिल्हाध्यक्ष संजय कोनकर, रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, संजय लोटणकर, शहर अध्यक्ष शैलेश रावकर, ज्येष्ठ नेते तानाजीआप्पा देशमुख, मारुतीराव देवरे, पी. व्ही. सनीलकुमार, वसंत शेडगे, नवनीत डोलकर, अरुण वाघमारे, धर्मा ठाकूर, आनंद काळे, मेघना ओक, ज्योती सनीलकुमार आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. मोहिते यांची दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. आपल्या गावातील पत्रकारांशी संवाद साधताना अॅड. मोहिते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. आम्ही सत्तेत आलो तर शेतकर्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा शेतकर्यांच्या बांधावर जाऊन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सत्ता आल्यावर शांत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारची काम करण्याची पद्धती ही अत्यंत चुकीची असून युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या अनेक चांगल्या प्रकल्पांना स्थगिती मिळाल्यामुळे त्याचा जाब विचारला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. मंगळवारी शेतकर्यांच्या न्याय हक्कांसाठी, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधात रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजप धरणे आंदोलन करणार आहे.
रोह्यातील धरणे आंदोलनाला राम मारुती चौकातून प्रारंभ होणार असून रोहा तहसील कार्यालय येथे 1000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोह्यातील स्थानिक प्रश्नांबाबत नजीकच्या काळात आंदोलन छेडण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला.