कर्जत : बातमीदार
तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे पांढर्या रंगाच्या चार गाड्यांतून आलेल्या अज्ञात इसमांनी 20 फेब्रुवारी रोजी रात्री अपहरण केले होते. त्याबाबतची फिर्याद दाखल होताच कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासात सहा अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना कर्जतच्या प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर
केला आहे.
गणेश अनंता घारे (वय 35 वर्षीय) हा तरुण 20 फेब्रुवारी रोजी सांगवी येथील उल्हास नदी पात्रामध्ये अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी नदीच्या बाजूच्या रस्त्यावर पांढर्या रंगाच्या गाड्यांमधून आलेल्या अज्ञात लोकांनी गणेश घारे याचे अपहरण केले होते. या प्रकरणी गणेशचा भाऊ योगेश घारे यांनी तक्रार दाखल करताच कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्जतचे पोलीस निरीक्षक भोर आणि उपनिरीक्षक गावडे यांनी नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या सहकार्याने नेरळ गावातील आनंदवाडी येथून गणेश घारे यांची सुटका केली आणि अपहरण करणार्या सहा जणांना त्यांनी वापरलेल्या वाहनांसह कर्जत येथे नेले. त्यांना अटक करून 21 फेब्रुवारी रोजी कर्जत प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयासमोर हजर केले, त्यावेळी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.दरम्यान, अपहरण झालेल्या गणेश घारे याने आरोपी राजू मरे यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्यासाठी आपल्याला नेण्यात आले होते, असा जबाब कर्जत प्रथम वर्ग न्यायालयात दिला. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी संपण्याआधीच कर्जत पोलिसांनी त्या सर्व सहा आरोपींना पुन्हा कर्जत प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला असून सर्वांची सुटका झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper