Breaking News

अर्थविश्वही ‘कोरोना’च्या कवेत

चीनमध्ये थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव एव्हाना जगभरात झाला आहे. या व्हायसरने अनेकांचा बळी घेतला असून, असंख्य जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आता ‘कोरोना’ने अर्थविश्वाला आपल्या कवेत घेतले असून, जागतिक पातळीवरील अर्थकारणावर त्याचे विपरित परिणाम जाणवू लागले आहेत.

जगातील महासत्तांपैकी एक असलेल्या चीनला नववर्षात झटका देणार्‍या कोरोना विषाणूने आता जगभरातील गुंतवणूकदारांनाही आपला डंख मारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक देशांतील गुंतवणूकदारांवर संक्रात आली आहे. कोरोनाचे तडाखे जगातील प्रमुख शेअर बाजारांना बसताना दिसत आहेत. यात अमेरिकेचा डाऊ जोन्स या निर्देशांकात प्रचंड घसरण झाली असून, उद्योजकांचे अब्ज डॉलर्स बुडाले. वॉरेन बफे, जेफ बेझोस, बिल गेट्स या धनाढ्य उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे भल्याभल्यांची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे.जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक व अमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांना शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसला. बेझॉस यांच्या मालमत्तेत 11.9 अब्ज डॉलर्सची घट झाली. मायक्रोसॉफ्टचा शेअर मागील महिनाभरात 188 डॉलर्सवरून 158 डॉलर्सपर्यंत खाली आला. परिणामी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांच्या मालमत्तेत 10 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. फ्रान्सचे उद्योजक असलेल्या बर्नाड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 9.1 अब्ज डॉलर्सची कमी आली. टेस्ला कंपनीचे प्रमुख इलोन मस्क यांचीची मालमत्ता नऊ अब्ज डॉलर्सनी कमी झाली. शेअर बाजारातील पडझडीने प्रख्यात गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफे यांनादेखील मोठे नुकसान सहन करावे लागले. बफे यांच्या मालमत्तेत 8.8 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. अमॅन्सिओ ओर्टेगा यांच्या मालमत्तेत आतापर्यंत 6.8 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसला आहे. झुकरबर्ग यांची मालमत्ता 6.6 अब्ज डॉलर्सने कमी झाली. गुगलचे सहसंस्थापक असलेल्या लॅरी पेज यांची संपत्ती 6.4 अब्ज डॉलर्सने घटली. उद्योजक कार्लोस स्लीम हेही यातून वाचू शकले नाही. स्लीम यांची मालमत्ता 6.3 अब्ज डॉलर्सने कमी झाली. अल्फाबेट कंपनीचे सीईओ आणि सह संस्थापक असलेल्या सर्गे ब्रीन यांची मालमत्ता 6.2 अब्ज डॉलर्सने कमी झाली. भारतात गुंतवणूकदारांचे जवळपास सहा लाख कोटींचे नुकसान झाले. एकूणच कोरोना विषाणू एकीकडे माणसांचे बळी घेत असताना दुसरीकडे मोठी आर्थिक झळ देऊन तो दुहेरी कात्रीत पकडत आहे. गंभीर बाब म्हणजे या विषाणूवर अद्याप लस वा औषध शोधण्यात यश आलेले नाही. परिणामी बळींचा आकडा वाढत आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे 2800हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर 82 हजारहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूने आता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कहर करायला सुरुवात केली आहे. जगभरातील शेअर बाजार यामुळे कोसळले आहेत. कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे. अमेरिकन आणि युरोपियन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे जगातील एकंदर अर्थव्यवस्थेवर त्याचे पडसाद पहावयास मिळत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply