लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परस्परांना शह देण्यासाठी फोडाफोडीही सुरू झाली असून, पहिलीच फोडाफोडी भाजपने करून काँग्रेसला शह दिला आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपत प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम करणारा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली आहे. विशेष करून काँग्रेसला मोठे धक्के बसू लागले असून, यापुढेही धक्क्यांची मालिका ही अशीच सुरू राहणार असल्याने या धक्क्यातून काँग्रेसवाले किती सावरतात हे येणार्या काळात दिसून येणार आहे. राज्यात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात जी काही राजकीय घराणी आहेत त्यात अहमदनगर जिल्ह्यातील विखे घराण्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण या घराण्याचे योगदान राजकीय, सामाजिक, सहकारी क्षेत्रात मोठे आहे. त्यामुळे अहमदनगरचे राजकारण विखे पाटील परिवाराशी नेहमीच निगडित राहिलेले आहे. अशा विखे-पाटील घराण्याचे युवराज डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भविष्याचा विचार करून परंपरागत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. किती वर्षे एकाच पक्षाचे जू अंगावर घेऊन वाटचाल करायची असा उदात्त विचार करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा राजकीय परिणाम नगरच्या राजकारणावर निश्चितच होणार आहे. शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची देखील राजकीय कसोटी पाहणारा हा निर्णय आहे. कारण डॉ. सुजय हे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे ते आता नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे इष्ट ठरेल. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरची जागा डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने सोडावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे केली होती, पण राष्ट्रवादीने तेथे आपला हक्क न सोडल्याने अखेर त्याची परिणती डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशात झाली आहे. शरद पवारांनी आपला नातू पार्थला उमेदवारी मिळवून देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांचा बालहट्ट मात्र पुरविला नाही. याचे शल्य नेहमीच विखे-पाटील परिवाराला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात डॉ. सुजय यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे. युवाशक्तीच्या रूपाने नवे नेतृत्व भाजपला मिळाले आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत योग्य ती फिल्डिंग लावून सुजयसारखे तगडे व्यक्तिमत्त्व भाजपत सामील करून घेण्यात चतुराई दाखविलेली आहे. याचा फायदा भाजपला लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीतही झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासही झपाट्याने होत आहे. अशा परिस्थितीत आपणही विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय सुजय यांनी घेऊन राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण दिले आहे हे निश्चित.