Breaking News

अत्यावश्यक कामाशिवाय जनतेने बाहेर पडू नये -महसूल आयुक्त शिवाजी दौंड

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : कोकण विभागातील जनतेला आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनासंदर्भात कोकण विभागात शासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्या असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा काम करीत असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही दिवसांत कोकण विभागातील सात जिल्ह्यांत महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवर यंत्रणा सज्ज आहे. संबंधित जिल्हाधिकार्‍यांना आणि जिल्हास्तरीय अधिकार्‍यांना आवश्यक ते प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारपासून कोकणातील महत्त्वाची देवस्थाने भाविकांसाठी बंद करण्यात आली असून त्यात केवळ पूजा केली जाईल. विमानतळ आणि जेएनपीटी येथे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोरोना उपाययोजनेसाठी कोकण विभागात 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वाटप जिल्ह्यांना करण्यात आले आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन वैद्यकीय तपासणी केंद्र सुरू करण्यात आली असून बाहेरून येणार्‍या वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. कोकण विभागात अनेक ठिकाणी पालखी सोहळा, यात्रा, शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तेदेखील स्थानिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेस उपायुक्त (महसूल) सिधाराम सालीमठ, उपायुक्त (पुरवठा) शिवाजी कादबाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, उपजिल्हा रुग्णालय पनवेल डॉ. बी. जी. फाळके आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply