Breaking News

कोरोना : सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

नागोठणे : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी नागरिकांना केले आहे.

 कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत सर्व शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यशाळा, मोर्चा, धरणे, आंदोलन तसेच गर्दी होणारे सभा, मेळावा, जत्रा, यात्रा, उरूस आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा आदींवर पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गर्दी होणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन केल्यास संबंधित संयोजकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम2005 चे कलम 51 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक घुटुकडे यांनी सूचित केले. येथील शिवाजी चौकालगत दर रविवारी भरणारा आठवडा बाजार पुढील दोन रविवार भरणार नसून तसे ग्रामपंचायतीकडून जाहीरसुद्धा करण्यात आले असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर आतमध्ये येणार्‍या सर्वांची तपासणी करूनच आत सोडण्यात येत आहे. बाहेरून नव्याने येणार्‍या मजूर तसेच इतर व्यक्तींना आतमध्ये सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून कंपनी व्यवस्थापनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील एसटी बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे. एसटी बसस्थानकावर सध्या शुकशुकाट असल्याचे दिसून आले. याबाबत बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांना विचारले असता, स्थानकात येणार्‍या नियमित एसटी बसेस येथे येत आहेत. मात्र, शाळांना सध्या सुट्टी दिली असल्याने फक्त विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या एसटी बसेस सध्या बंद करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथील बाजारपेठेवर सुद्धा मंदीचे स्वरूप आले असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply