खालापूर : प्रतिनिधी
पेटीएममधून बोलत असून, आपली ग्राहक ओळख (केवायसी) मुदत संपत असल्याचे सांगून, बनावट लिंकद्वारे एका ग्राहकाला 88 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याची घटना खोपोलीत घडली आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासरंग येथे राहणार्या सुनील यांना त्यांच्या मोबाइलवर विजय नावाच्या माणसाने संदेश पाठविला की, पेटीएममधून विजय बोलत आहे. तुमच्या केवायसीची मुदत संपणार आहे. आम्ही एक लिंक पाठवत आहोत. त्याची प्रक्रिया पूर्ण करा, असे सांगत त्याने सुनीलच्या मोबाइल नंबरवर एक लिंक पाठविली. ती लिंक उघडून पाहत असताना सुनीलचा मोबाइल हॅक होवून त्यांचे एचडीएफसी बँकेच्या शाखेतील खोपोली खात्यामधून 88 हजार 500 रुपये अन्य खात्यात वळते झाल्याचा संदेश आला. या वेळी इंटरनेटच्या माध्यमातून विजयने फसवणूक केल्याचे सुनीलच्या लक्षात आल्यानंतर त्याने खोपोली पोलीस ठाणे गाठत विजय नामक आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर करीत आहेत.