अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी


कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे, मात्र तरीदेखील किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने लोक समाधानी असून खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, मिठाईची दुकाने मात्र खुली नसल्याने गुढीपाडवा गोडाशिवाय कसा साजरा करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कर्जत तालुक्यातील सर्व बाजारपेठा सकाळी ठरावीक वेळ ठरवून देत सुरू झाल्या आहेत. या वेळी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत याची काळजी घेण्यात येत होती. नेरळ बाजारपेठेत सकाळच्या वेळी भाजीपाला तसेच दूध आणि फळांची दुकानेही उघडी ठेवण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून दुपारपर्यंत किराणा दुकाने उघडी ठेवण्यास मुदत देण्यात आली. माथेरानमधील रेशनिंगच्या दुकानांतदेखील सकाळी गर्दी होती. संचारबंदी असल्याने गावोगावी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणार्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. पळसदरी येथील मठामध्ये होणारा स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळाही यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper