पनवेल : बातमीदार
कोरोना विषाणूमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने बाहेरील व्यक्ती आत येऊ नये व गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये यासाठी तालुक्यातील गावांमधील रस्ते बंद करण्यात येत आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद देखील करण्यात आलेले आहेत. मात्र बंद रस्त्यांमुळे अत्यावश्यक सेवा सुविधा गावांमध्ये पोहोचू शकत नाहीत त्यामुळे पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी तालुक्यातील गावातील बंद केलेले रस्ते उघडण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे. कोरोना विषाणूचा धसका सर्वांनी घेतलेला आहे. त्यामुळे 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. पनवेल तालुक्यातील गावागावात व शहरात कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक मास्क व सॅनिटायझर लावत आहेत. विहिघर गावात राहणार्या नागरिकांना सॅनिटायझर लावूनच आत प्रवेश दिला जात आहे. तसेच येणाजाणार्या नागरिकांची नोंद वहीमध्ये ठेवली जात आहे. गावांमधील रस्ते बंद केल्यामुळे गावात अत्यावश्यक सेवा पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळणार नाहीत. रस्ते बंद केल्यामुळे डॉकटर, पाणी, सिलेंडर गावात पोहोचू शकणार नाहीत. या सुविधांपासून नागरिक वंचित राहू शकतात. त्यामुळे तहसीलदार पनवेल यांनी बंद केलेले रस्ते उघडण्याचे आवाहन केले आहे.
गॅस सिलिंडरची गाडी गावात आली नाही
नेरेपाडा गावातील तरुणांनी देखील गावाचा रस्ता बंद केला होता. मात्र बुधवारी (दि. 25) एचपी गॅस सिलिंडरची गाडी गावात आली नाही. त्यामुळे तरुणांनी हा रस्ता उघडण्याचा निर्णय घेतला व बुधवारी रात्री हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. इतर गावातील नागरिकांनी देखील आपल्या गावातील रस्ते चालू ठेवावेत, असे आवाहन तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.