पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला, तसेच संचारबंदीही लागू झाली आहे. त्याचा डोंगर, दर्याखोर्यात राहणार्या आदिवासी समाजावर विपरित परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर युसूफ मेहेरअली सेंटरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खारघर येथील शाश्वत फाऊंडेशनने कर्नाळा हद्दीतील कोरळवाडी या आदिवासी वस्तीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाचा धसका घेत ग्रामीण भागात गावागावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मजुरीस कोणी घेत नाही आणि लाकडाच्या मोळ्याही विकल्या जात नाहीत. त्यामुळे आदिवासींवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न त्यांना पडला होता. ते पाहून सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर त्यांच्यासाठी धावले. त्यांनी आदिवासींना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला शाश्वत फाऊंडेशनचे जयेश गोगरी आणि बिना गोगरी, तसेच दिनेश रावलिया यांनी प्रतिसाद देत कोरळवाडीत पाच किलो तांदूळ, प्रत्येकी एक किलो कांदे, बटाटे व मीठ, एक लिटर गोडेतेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सहकार्य केले. पनवेल तालुक्यातील कर्नाळा, साई, आपटा ग्रामपंचायत हद्दीत 20 आदिवासी वाड्या येतात आणि या वाड्यांत एकूण दोन हजार कुटुंब राहतात. यापैकी कोरळवाडीला शनिवारी (दि. 28) मदत मिळाली. या वेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष शिंदे, नीरज पाटील, विजय मासाल याची उपस्थिती लाभली. अशाच प्रकारे अन्य आदिवासी वाड्यांना मदत मिळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.