Breaking News

रामनवमीतही ‘सोशल डिस्टन्सिंग’

पोलादपूरमध्ये नियम पाळून जन्मोत्सव साजरा

पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कशेडी घाटात असलेल्या धामणदिवी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून रामनवमी साजरी करण्यात आली. या वेळी श्रीराम मंदिरात भाविकांना पाच फुटांच्या अंतरावर बसण्यासाठी चौकटी आखून देण्यात आल्याने यंदाचा जन्मोत्सव आगळावेगळा झाला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांत श्रीराम जन्मोत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले, तर बहुतांश ठिकाणी केवळ पूजन करण्यात आले, परंतु भव्य सभामंडप आणि श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भरत आणि मारूतीरायाच्या आकर्षक मूर्ती असलेल्या धामणदिवी गावात मंदिराच्या सभागृहापासून गाभार्‍यापर्यंत पाच फुटांच्या अंतरावर चौकोन आखून ग्रामस्थांना शासकीय नियम पाळून जन्मोत्सवात सहभागी होण्याचा आवाहन करण्यात आले होते.
या वेळी अनेकांनी तोंडावर रूमाल, मास्क आदी सुरक्षिततेचे उपायही केले. विणेकरी आणि सर्व भाविक या वर्षी श्रीरामनवमीच्या जन्मोत्सवाला एकमेकांपासून दूर राहिले. अगदी श्रीरामजन्माचा पाळणादेखील चौकोनात बांधण्यात आला होता. सर्वकाही शिस्तबद्ध व भक्तिभावाने झाले. सर्वांनी कोरोनाचे संकट दूर करण्याचे गार्‍हाणे श्रीरामाला घातले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply