Breaking News

नेरळमध्ये व्यापार करणार्यांना पोलिसांची ताकीद

अनेकांचे पासेस रद्द; व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याचे आदेश

कर्जत ः बातमीदार

नेरळ बाजारपेठेत किराणा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अंबरनाथ, उल्हासनगर व ठाणे येथून येऊन व्यवसाय करतात आणि पुन्हा घरी परततात. त्यामुळे नेरळ गावात याची चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत, तर पोलिसांनी उल्हासनगरमधून येणारी एक गाडी जमा केली आहे. दरम्यान, नेरळमध्ये बाहेरून येऊन व्यवसाय करणार्‍यांना बंदी घालण्यात आली असून त्यांनी याच ठिकाणी राहावे, असे आदेश जिल्हा पोलीस उपअधीक्षकांनी दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हा हद्द सील केली आहे. त्याचवेळी मेडिकल अडचणी वगळता कोणालाही जिल्हा हद्द ओलांडू दिली जात नाही. नेरळ बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणारे व्यापारी हे व्यवसायानिमित्त नेरळमध्ये येणे हे नेरळ गावासाठी अत्यंत धोकादायक असून सध्या ठाणे जिल्ह्यातील अगदी बदलापूरपर्यंत कोरोना येऊन पोहचला आहे. सहा-सात व्यापार्‍यांना किराणा माल आणण्यासाठी टेम्पोचा परवाना नेरळ पोलीस स्टेशनमधून देण्यात आला आहे. तो आपल्या गाडीला लावून ते दररोज नेरळमध्ये येत आहेत आणि रात्री पुन्हा उल्हासनगर आणि ठाणे येथे जात आहेत. नेरळ अथवा माथेरानमध्ये व्यवसाय करणारे काही व्यापारी दररोज जिल्हा हद्द ओलांडून जात आहेत आणि पुन्हा जिल्हा हद्द ओलांडून नेरळमध्ये येत आहेत. त्यातील पाच जण नेरळ गावात, तर दोघे माथेरानमध्ये जाऊन किराणा दुकानाचा व्यवसाय करतात. माथेरानमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. तेव्हापासून माथेरान सर्वांसाठी बंद केले आहे. असे असताना दोन व्यापारी चक्क उल्हासनगर येथून येऊन व्यवसाय करीत आहेत, तर नेरळमध्ये व्यवसाय करणारे यातील चार हे उल्हासनगरातून, तर एक ठाणे येथून दररोज नेरळ गावात येत आहे. याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने त्यांना नेरळ येथे राहायला सांगितले आहे. त्याचवेळी त्यांना शेलू येथे असलेल्या रायगड जिल्हा हद्दीमधून सोडण्यात येऊ नये, असे आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी दिले आहेत. त्याचवेळी त्यांना केवळ मालवाहतूक करण्यासाठी टेम्पोकरिता दिलेले पासेस तपासून रद्द करण्याची कारवाई नेरळ पोलिसांनी नुकतीच केली. उल्हासनगर येथून सकाळी नेरळला येत असलेल्या व्यापार्‍याची गाडी नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याचवेळी पोलिसांनी किराणा मालाची वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेले पासेसदेखील काढून टाकले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे बाहेरून येणारे व्यापारी हवालदिल झाले असून यापुढे जिल्हा हद्द ओलांडून कोणताही व्यापारी येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply