
कर्जत : बातमीदार
महाराष्ट्र दिनाचा 60वा वर्धापनदिन मात्र कोरोनाच्या संकटामुळे तो साजरा करण्यात आला नाही. साधे ध्वजारोहण सुद्धा करता आले नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रदिनी ध्वजस्तंभ ध्वजा विनाच उभे होते. तालुक्यात कोणताही कार्यक्रम करण्यात आला नाही. मात्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन अनेकांना समाधान मानावे लागले. ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. कर्जतमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्रदिन तसेच कामगार दिन साजरा करण्यात येतो. तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदी शासकीय कार्यालयांमध्ये महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण करण्यात येते. परीक्षा झाल्यामुळे शाळांना सुटी असते मात्र परीक्षेचा निकाल 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण सोहळा झाल्या नंतर जाहीर करून गुणपत्रिका देण्यात येतात. हे आयोजन बहुतांश शाळांमध्ये करण्यात येते परंतु कोरोनाच्या संकटामुळे परिक्षासुद्धा झाल्या नाहीत. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण सोहळा करायचा या शासकीय फतव्यामुळे तालुक्यात कुठेही ध्वजारोहण किंवा कोणताही समारंभ करण्यात आला नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper