उरण ः प्रतिनिधी
उरण बाजारपेठ सोमवारपासून (दि. 4) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आली. त्यात दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या वेळी अत्यावशक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. यातील बहुसंख नागरिक दुचाकी घेऊन आल्याचे दिसून आले. परिणामी येथील काही बेशिस्त नागरिकांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र बाजारात सर्वत्र दिसत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्याने सोमवारी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, जनरल, कपडे, भांडी, गॅस शेगडी दुरुस्ती दुकाने सुरू झाल्याने लॉकडाऊन झाल्यापासून बंद असलेल्या इलेक्ट्रिकल वस्तू, गॅस शेगडी, पाण्याचे फुटलेले पाइप, नळ आदी सामानाच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.