श्रीवर्धन पोलिसांकडून हजारोंचा दंड वसूल
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासकीय यंत्रणेला आव्हानात्मक ठरत आहे. श्रीवर्धन शहराच्या लगत असलेल्या भोस्ते गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तहसील कार्यालय व श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यांतर्गत नाकाबंदीत 32 मोठ्या वाहनांवर कारवाई करून 23,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 18 दुचाकीही जप्त करण्यात आल्या. श्रीवर्धन प्रशासकीय यंत्रणेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे विनाकारण फिरणार्या व्यक्तींवर लगाम बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रशासकीय सेवा बजावणारे कर्मचारी व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुचाकींना श्रीवर्धन शहरात पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. श्रीवर्धन प्रवेशद्वार, शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयेंद्र पेढवी व वाहतूक हवालदार दत्तात्रय पाटील यांच्यासह पोलीस पथकाने विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई केली. किराणा दुकानदारांनी शुक्रवारपासून स. 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीवर्धन शहरात बाहेरून ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणार्यांना आपली वाहने शहराच्या प्रवेशद्वार परिसरात ठेवावी लागणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून आपण आपला परिसर कोरोनामुक्त करू शकणार आहोत. तरी सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून श्रीवर्धन नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचना केल्या जात आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तू सहजासहजी उपलब्ध करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्यानुसार किराणा दुकाने आपण दिवसभर सुरू ठेवली आहेत. जनतेने विनाकारण गर्दी करू नये. नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे.
-सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धन
श्रीवर्धन शहरात विनाकारण फिरणार्या वाहनांवर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. जनतेने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिस्त पाळणे आवश्यक आहे.
-प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन