Breaking News

जासई भागातील शेतकर्यांना थेट बांधावर मिळणार कृषिसेवा

चिरनेर : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना सर्व कृषिसेवा थेट बांधावरच देण्याचा उपक्रम शासनाच्या उरण तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला आहे. यामध्ये जासई विभागातील चिरले, जांभुळपाडा, गावठाण या गावांमधील शेतकर्‍यांना खते व भातबियाणे थेट शेताच्या बांधावरच देण्यासाठी उरणचे कृषी सहाय्यक अधिकारी डी. टी. केणी यांनी प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी जाऊन शेतकर्‍याच्या नावे नोंदणीचा कार्यक्रम राबविला आहे. हा कार्यक्रम राबवित असताना ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कृषिमित्र आनंता पाटील यांचे चांगले सहकार्य लाभत असून, हि मंडळी या अभिनव उपक्रमासाठी खूप मेहनत घेत आहेत.  कृषी अधिकारी व शेतकर्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जागतिक महामारी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अर्थात भातबियाणांच्या दुकानातील गर्दी टाळण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना शासनाने ठरवून दिलेल्या रास्तदरात बियाणे व खते मिळावित यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण सोयीस्कर असा निर्णय घेतला आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर असून, खरिप हंगामातील  अर्थात पेरणीच्या कामांना सुरुवात होणार आहे. यासाठी पेरणी करण्यासाठी भातबियाणे व खतांची आवश्यकता असून, जासई विभागासाठी जया, तृप्ती, वाडाकोलम, अवणी आदी वाणांच्या जातीचे 20 क्विंटल भातबियाणे व 10 टन यूरिया खताची मागणी करण्यात आली असल्याची माहिती कृषी सहाय्यक अधिकारी डी. टि. केणी यांनी दिली.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply