
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत नगर परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी गटारांची कामे सुरू होती, मात्र कोरोनाचे संकट आल्याने ही कामे बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट गेल्यावर ही कामे होणार की नाही? आणि असे झाल्यास पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवेल असे वाटत असतानाच ही कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळाल्याने ही कामे सुरू करण्यात आली आहेत. कर्जत नगर परिषदेच्या वतीने अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. सात-आठ ठिकाणी मोठमोठ्या गटारांची कामेसुद्धा सुरू होती. काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना तर काही कामे सुरू करण्यात आली आणि जगभर कोरोनाचे संकट आले. परिणामी संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ही कामे बंद ठेवावी लागली. महिना सव्वा महिना ही कामे बंद राहिल्याने गटारे तुडुंब भरली, तर काही ठिकाणी गटारांचे केवळ खोदकामच झाले होते आणि ती बंद करावी लागली. आता ही कामे सर्व सुरळीत झाल्यावरच पूर्ण होणार असे वाटत असताना मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत यासाठी नगर परिषदेने जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे ही कामे सुरू व्हावीत यासाठी परवानगी मागितली होती. ती परवानगी मिळून काही ठिकाणची कामे सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper