पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, 39 रुग्ण आढळले आहेत. मुरूड व अलिबागमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर अलिबाग नऊ, पनवेल महापालिका व रोहा प्रत्येकी आठ, माणगाव तीन, खालापूर, मुरूड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी दोन, पनवेल ग्रामीण, पेण व तळा प्रत्येकी एक असे नवे रुग्ण आहेत.
पनवेल तालुक्यात कोरोनाच्या नऊ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचा कमी आलेला आकडा दिलासा देणारा असला तरी नवीन पनवेलचा रोज वाढणारा आकडा धोकादायक आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवार आठ नवीन रुग्ण आढळले असून, 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमध्ये एका डॉक्टरला संसर्ग झाला असून, दोघांनी कोरोनाला हरविले आहे. तालुक्यात कोरोनाचे आतापर्यंत 524 रुग्ण आढळले आहेत, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन पनवेलमध्ये इंद्रायणी सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट पोझिटीव्ह आले असून, कुटुंब प्रमुखाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 2 येथील रिलायन्स बिल्डिंगमधील 32 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. (पान 2 वर..)
कामोठे सेक्टर 25मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या कुटुंब प्रमुखाला यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे.
खारघर नावडे फेज-2मधील रहिवासी व जेएनपीटी उरण येथील कस्टम कार्यालयात काम करणार्या व्यक्तीच्या पत्नीला कोरोना झाला असून, पतीपासूनच तिला संसर्ग झाला आहे. कळंबोली 2 ईमधील 59 वर्षीय महिलेला तिच्या मुलापासून संसर्ग झाला आहे. रोहिंजण येथील न्यू कॉलनीतील साठे निवासमधील 26 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 2365 नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 401 पॉझिटिव्ह असून, 25 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 234 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 149 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचे बरे होण्याची सरासरी 58.35 टक्के आहे. नवीन पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याची सरसरी कमी म्हणजे 48.38 आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये एक नवीन रुग्ण आढळला असून, ही व्यक्ती पाली देवद (सुकापूर) येथील बालाजी सिंम्फोनीमध्ये राहाणारी असून, कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. ग्रामीण भागात 419 टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 46 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 163 रुग्ण आढळले. त्यापैकी 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 54 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper