उरण : प्रतिनिधी
उरणमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढल्यामुळे ग्राहकांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरविली आहे.त्यामुळे मासेविक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर मच्छी मार्केटबाहेरच मासळी सुकविण्याची वेळ ओढवली आहे.
उरणमध्ये दररोज मासेमारी करणारे आपल्या जीवावर उदार होऊन समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी मेहनत घेऊन मिळेल ती मासळी उरणच्या बाजारात विकण्यास येत आहेत. परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये मासळी खवय्यांनी कोरोनाच्या भितीने मासळीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्यांनी आपल्या मेहनतीचे सुद्धा पैसे मिळेनासे झाल्याने शिल्लक राहिलेली मासळी सुकविण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही.
रात्रंदिवस मासेमारीसाठी मेहनत घेत आहोत. परंतु लॉकडाऊनमुळे ग्राहकांनी मासे खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मग शिल्लक मासळी सुकविण्यापलीकडे पर्यायच उरला नाही. त्यामुळे सुकी मासळी विकून दोन पैसे मिळतील, असे येथील कोळी बांधव-महिला भगिनींनी सांगितले.