खोपोली पालिकेकडून अजब नालेसफाई

खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले व गटारे स्वच्छता मोहीम अजबरित्या सुरू आहे. गटारे किंवा नाल्यातून गाळ बाहेर काढून त्या त्या गटारी व नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी असा गाळ काढून आठवडा उलटला तरीही तो आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. काढलेला गाळ पुन्हा गटारीत पडत आहे. या संबधी मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, नाले व गटार सफाई निव्वळ फास आहे की काय असे चित्र निर्माण होऊन नगरपालिका कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
खोपोली नगरपालिका म्हणजे एखादी योजना किंवा उपक्रम फक्त निधी खर्च करण्यापुरती उरली असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. अनेक उपक्रम योजनांसाठी धुमधडाक्यात निधी खर्च केला जात आहे. मात्र त्याला अंतिम स्वरूप दिले जात नाही. असाच प्रकार नाले व गटारी स्वच्छता मोहीमेत ही दिसत आहे. काढलेला कचरा व गाळ च्या दुर्गंधीने नागरिक हैराण तर आहेतच परंतु त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने काढलेला गाळ व कचरा पुन्हा गटारीत पडत असल्याने या नाले व गटारी सफाई चा उपयोग येणार्या मान्सूनमध्ये किती होणार या बाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper