भाजपचाही आंदोलनाचा इशारा
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर संस्थेच्या शासनाने दिलेल्या मैदानावर बांधकाम आराखडा मंजूर करू नये आणि जर तो मंजूर केल्यास मैदान बचाव समिती आणि भाजपचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जत नगर परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्जत नगर परीषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर 174/19 ही जागा शासनाने 1966मध्ये मैदान म्हणून वापरण्यास नाममात्र एक रुपयाने लीजने दिली असल्याचे सनदेत नमूद केले आहे, परंतु सदर जागा लीजने पुढे विकत घेण्याचा पर्याय असताना संस्थेने मालकी हक्काने विकत घेतली व सदर जागा ही कर्जत गावठाणातील जुने मैदान असल्याने सदर जागेचा मंजूर प्रयोजनाच्या व्यतिरिक्त वापर करू नये, असे तहसीलदार यांच्या आदेशात नमूद केले आहे. सदर जागेवर संस्थेने 19 गाळे बांधण्याची परवानगी धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मिळवल्याने कर्जत ग्रामस्थांनी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर बचाव समिती स्थापित करून समन्वयक वकील ऋषीकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मागील अधिवेशनात उपस्थित केली असून त्यावर निर्णय प्रलंबित आहे. नागरिकांमध्येसुद्धा या प्रकरणी असंतोष आहे.
मैदान बचाव समितीने कर्जतमधील नागरिकांच्या सहकार्याने हरकती उपस्थित केल्या असून नगर परिषद प्रशासनास ई-मेल पत्र व ऋषीकेश जोशी वकील यांनी विविध सरकारी कार्यालयास नोटीस दिली आहे. तसेच नाभिक समाज संघ मैदान वाचवण्याबाबत आक्रमक आहे. कर्जत नगर परिषद प्रशासनाने याबाबत एक वेळा सुनावणी घेतली असून दोन वेळा बांधकाम आराखडा नामंजूर केला आहे. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. असे असताना पुन्हा या मैदानावर नवीन गाळ्यांचे बांधकाम करण्यासाठी आराखडा मंजूर करण्यासाठी संबंधित संस्थेने अर्ज दाखल केल्याने याविरोधात मैदान बचाव समितीने आणि भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे.