पाली : प्रतिनिधी
चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यातच आता वरुणराजाने वर्दी दिल्याने या वादळग्रस्तांची चिंता वाढली आहे.
चक्रीवादळात अनेकांच्या घरांचे पत्रे, कौले उडून फर्निचर, अन्नधान्य, भांडी असे सारे काही भिजून मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाजारात घर दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पत्रे, सिमेंट, पाईप उपलब्ध नसल्याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. याबरोबरच अनेक भागातील बत्ती गूल झाल्याने मोठी समस्या उद्भवली आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांना आता यातून सावरण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे, मात्र राज्य सरकारची तातडीची मदत अद्याप नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या वादळग्रस्तांसमोर आता पावसापासून वाचण्याचे संकट उभे राहिले आहे.विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस अशा एकापाठोपाठ एक परीक्षा देताना रायगडकर खचत चालला आहे. पुन्हा झाडे उन्मळून पडण्याची व पत्रे उडण्याच्या भीतीने सार्यांचाच पोटात भीतीचा गोळा येत आहे. या काळात अनेकांना निवारा नसल्याने पुढे काय करावे, कसे जगावे असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. राज्य शासनाने आता तरी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून दिलासा द्यावा, अशी मागणी वादळग्रस्तांकडून होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper