राज्यातील तीन चाकी महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद एव्हाना पुरेसे चव्हाट्यावर आले आहेत. जुन्या खाटांचे कुरकुरणे सरकारमधील भागीदार पक्षानेच जगजाहीर केले. अखेर बर्याच कुरकुरण्यानंतर नाराज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक गुरुवारी पार पडली असली तरी तिघाडी काम बिघाडी हेच अखेर खरे ठरणार!
सत्तेच्या लोभातून कुटिल डावपेच खेळून जनाधार नसतानाही सत्ता काबीज केल्यानंतर जे-जे काही घडते ती सारी अपेक्षित वळणे घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे. आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेस पक्षाला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. इतर नेत्यांकडूनही कधी खासगीत तर कधी जाहीरपणे हाच सूर लागत आहे. या सार्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठकही पार पडली होती. गेला जवळपास आठवडाभर ही नेतेमंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत होती असे सांगितले जाते, परंतु भेट काही त्यांना मिळत नव्हती. दरम्यान, जुन्या खाटांच्या कुरकुरण्याचे जाहीर वाभाडेही काढले गेले. बापुडवाण्या अवस्थेत सत्तेला चिकटून राहणे पत्करलेल्यांनी मग आपल्याला जनेतेच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्याचा सूर लावला. गुरुवारी अखेर त्यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला. तसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून झाले होते, परंतु ठाकरे आणि पवार यांची जवळीक हेच काँग्रेसचे खरे दुखणे असल्याने त्यावर तोडगा कसा निघणार? सारेच सत्तेचे लोभी त्यामुळे एकीकडे कुरकुरणे सुरू ठेवून दुसरीकडे सरकारमध्ये सारे आलबेल असल्याची ग्वाही द्यायची असा सारा तिघाडीचा कारभार सुरू आहे. सत्ताधार्यांनीच म्हटल्यानुसार हे राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. या सार्या अनुभवाच्या जोरावर कामाचा अनुभव नसला तरी राज्याचा गाडा कसाबसा ओढता येतो असेही सत्ताधार्यांना वाटत असावे. त्यामुळेच समोर अभूतपूर्व असे कोरोना संकट उभे ठाकलेले असताना परस्परांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे त्यांचे उद्योग बिनदिक्कत सुरू आहेत. एकीकडे आपल्याला निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही असे कुरकुरतानाच दुसरीकडे आम्ही भक्कमपणे महाविकास आघाडीत आहोत, असे सांगणे हे केवळ जुन्याजाणत्या काँग्रेस पक्षालाच जमू शकते. सरकारमध्ये आपले ऐकून घेतले जात नाही. सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही अशा मुलाखती काँग्रेसचे नेते बड्या इंग्रजी वर्तमानपत्रांना देतात आणि हे संयमी कुरकुरणे सुरू ठेवून त्याच वेळी छातीठोकपणे सरकारला अजिबात धोका नाही, अशी ग्वाहीही देतात. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सातत्याने महाराष्ट्रच रुग्णसंख्या व मृतांच्या संख्येबाबतीत आघाडीवर आहे, परंतु आकड्यांचा खेळ करीत मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्याची क्षमता असूनही हेतुपुरस्सर चाचण्यांचे प्रमाण कमी ठेवत राज्यातील सरकार समोर ठाकलेल्या संकटाची भयावहता नाकारत आहे. वास्तवत: खंबीर राजकीय नेतृत्वाचा अभाव हेच या सार्या गोंधळाच्या मुळाशी आहे. दुसरीकडे केंद्र सरकारकडे बोट दाखवून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची आवई उठवून स्वत:चा बचाव करायचा असा प्रयत्नही सुरू आहे. दूरदृष्टी आणि कृतिशीलतेच्या अभावाच्या या परिस्थितीत सारा कार्यभार नोकरशाहीच्या हातात नाही गेला तर नवलच. या अवघ्या विरोधाभासाच्या भारानेच हे तीन चाकी सरकार कोसळेल, हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे येणारा काळच खरे ठरवेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper