Breaking News

चक्रीवादळग्रस्त माथेरानकर मदतीच्या प्रतीक्षेत

कर्जत : बातमीदार
निसर्ग चक्रीवादळात माथेरानमध्येही दाणादाण उडाली. हे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल म्हणून राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या मदतीकडे नुकसानग्रस्तांचे डोळे लागले आहेत, मात्र 20 उलटूनही माथेरानमध्ये मदत पोहोचलेली नाही.
माथेरानमध्ये शेती नाही वा उद्योगधंदे नाहीत. फक्त येथे येणार्‍या पर्यटकांवर माथेरानकरांचा उदरनिर्वाह चालतो. त्यातच कोरोना विषाणूमुळे 17 मार्चपासून लागलेल्या लॉकडाऊनपासून भांडवल येणेही बंद झाले. जे काही साठवले होते त्यातच नागरिकांची गुजराण सुरू होती. अशा संकटात माथेरानचे लोक असतानाच 3 जूनला आलेल्या चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला.
माथेरानमध्ये काही लोकांच्या घराची छपरे उडाली, तर तीन घरे जमीनदोस्त झाली. एका घोडेवाल्याच्या तबल्याचे छप्पर उडाले आणि त्यातील पत्रा लागून तो घोडेवाला जखमी झाला.
आता राज्य शासनाकडून मदत मिळेल या आशेवर माथेरानकर आहेत. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत, मात्र चक्रीवादळाला एवढे दिवस उलटूनही अजूनही नुकसानग्रस्तांच्या नशिबी निराशाच आहे.
पालकमंत्री, स्थानिक आमदाराची पाठ
चक्रीवादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्याची वाताहत झाली. त्याची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्याचा पाहणी दौरा केला, मात्र माथेरानला यायला त्या विसरल्या. त्यामुळे माथेरानही रायगड जिल्ह्यात आहे. येथे येऊन येथील परिस्थिती पहा, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे, तर  स्थानिक आमदार महेंद्र थोरवे हे 9 जूनला माथेरान शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त येणार होते. लोकांच्या नजरा आमदार येण्याकडे होत्या, पण आमदार थोरवे यांनी कारण पुढे करीत ते फिरकलेच नाहीत. त्यामुळे माथेरानकर संतापले आहेत.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply