कर्जत : बातमीदार
गेल्या 15 दिवसांपासून वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे भाताची रोपे सुकू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही, तर बळीराजावर भाताची रोपे पुन्हा रुजविण्याची वेळ येणार आहे.
कर्जत हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखळा जातो. तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. खरिप हंगामासाठी शेतकर्यांनी बाजारातून भाताचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली, मात्र 12 जूनपासून पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतात हिरवेगार बनलेले रोप आता सुकण्यास सुरुवात होऊन ते आता पिवळ्या रंगाचे बनत चालले आहे. त्यामुळे काही शेतकरी शेतात असलेल्या विहिरीचे पाणी वीज पंपाच्या सहाय्याने पुरवित भाताची रोपे जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ज्या शेतकर्यांच्या जमिनी माळरानावर आहेत ते रोपे वाचविण्यासाठी पाणी वाहून आणून रोपाला घालत आहेत.
जून अखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मात्र भाताचे पीक पूर्णपणे सुकून जाईल. त्यानंतर भाताचे नवीन बियाणे विकत घेण्याचे आव्हान शेतकर्यांपुढे असणार आहे. आधीच कोरोनामुळे शेतकर्यांची आर्थिक स्थिती बेताची बनली आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. आता पावसाअभावी बळीराजा चिंतेत पडला असून, आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper