ट्रॅव्हल्सवाल्याने शोधला उदरनिर्वाहासाठी पर्याय

कळंबोली : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील ट्रॅव्हल्स व्यवसाय करणारी दुकाने बंद आहेत. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत ट्रॅव्हल्स दुकानदार सापडले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवर कामाला असणार्या हितेश पंड्या याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला आहे. अपंगत्वावर मात करीत शेतकर्यांकडून भाजी खरेदी करून पनवेल शहरात तो त्याची विक्री करत आहे. यामुळे तुटपुंज्या नफ्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.
कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. 24 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दूध, भाजीपाला, दवाखाने, किराणा दुकाने वगळली असता इतर दुकाने पूर्णत: बंद करण्यात आली होती. यात ट्रॅव्हल्स व्यवसायही बंद झाले आहेत. ही बुकिंग दुकाने बंद झाल्याने येथे काम करणाजया अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हितेश पंड्या याला लहानपणी पोलिओमुळे अपंगत्व आले. त्यामुळे मागील 18 वर्षांपासून येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीत बुकिंगचे काम करीत आहे. मात्र दुकान तीन महिने बंद असल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. घरी थकलेले आई-वडील आहेत. त्यांच्या उपचाराकरिताही अडचणी येऊ लागल्या. घरभाडे भरणे अशक्य झाले आहे. अपंग असल्याने दुसरे काम जमण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला. मित्राच्या साहाय्याने पैसे जमवून शेतकर्यांकडूनच भाजी खरेदी करून स्वस्त दरात पनवेलमध्ये हितेश सध्या भाजी विक्री करीत आहे. मिळणार्या तुटपुंज्या नफ्यातून घर चालवणे शक्य झाले असल्याचे हितेश यांनी सांगितले. लहानपणी अपंगत्व आले. परंतु निराश न होता दहावीपर्यंत इंग्लिश माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून फर्निचर दुकानात नोकरी केली. त्यानंतर 18 वर्षे ट्रॅव्हल्स कंपनीत बुकिंग एजंट म्हणून काम केले. कोरोनामुळे रोजगारच थांबला. जगणे असह्य झाले. घरभाडे थकले. पायाने अपंग असल्याने जड काम करू शकत नाही. अशात स्वत:ला सावरत भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू करून आपल्या अपंगत्वावर पुन्हा एकदा मात केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper