Breaking News

कर्मचारी भरतीत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाल्यास ‘आरसीएफ’विरोधात आंदोलन करणार

भाजपचे महेश मोहिते यांचा इशारा

अलिबाग ः प्रतिनिधी
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरने (आरसीएफ) तांत्रिक कर्मचारी भरती सुरू केली आहे. या भरतीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले पाहिजे. तसे न केल्यास भारतीय जनता पक्ष आरसीएफविरोधात आंदोलन करेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिला आहे. अलिबाग येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मोहिते बोलत होते. या वेळी अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे,
सतीश लेले, ज्येष्ठ नेते हेमंत दांडेकर आदी उपस्थित होते.
आरसीएफने तांत्रिक कर्मचारी भरतीसाठी जाहिराती दिल्या आहेत. भरतीसाठी येणार्‍या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी एका संस्थेला कंत्राट दिले. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होणार आहे. यात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार आहे, असा आरोपही अ‍ॅड. मोहिते यांनी केला.
लवकरच दिल्लीला जाऊन आम्ही खते आणि रसायनमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेणार आहोत. आरसीएफ भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत. काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी आरसीएफ कंपनीत जाऊन भरतीसंदर्भात  कंपनीच्या प्रशासनाशी चर्चा केली, परंतु यात प्रकल्पग्रस्तांचा उल्लेख केल्याचे कोठेही दिसत नाही. काही वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा या प्रकल्पग्रस्तांना किमान कंत्राटी कामगार म्हणून तरी कामावर घ्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचाही पाठपुरावा आमदार महेंद्र दळवी यांनी केला नाही. आता या भरती प्रक्रियेसंदर्भातदेखील ते काहीही बोलत नाहीत,
अशी टीकाही अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply