11 जुलैचे आंदोलन यशस्वी करा : जगदीश गायकवाड
पाली : प्रतिनिधी
राज्यात दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जुलै रोजी रमाबाईनगर हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सर्वांनी सहभाग घेऊन यशस्वी करा, असे आवाहन रिपाइचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी केले आहे.
आजघडीला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत, तालुक्यात दलित, मागास व दुर्बल घटकांचे शोषण व अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची भावना जनमानसात आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता रिपाइंने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 11 जुलै रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत आपापल्या जिल्ह्यात, शहरात, तालुक्यात व विविध ठिकाणी लोकशाही मार्गाने तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून अत्याचारविरोधी आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन जगदीश गायकवाड यांनी केले आहे.